सिंदखेडराजात महिला विद्यापीठ उभारण्यासाठी हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांचा राज्यपालांना प्रस्ताव…

महिला सक्षमीकरणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधणार

वऱ्हाडाच्या भूमीतील सिंदखेडराजा येथे जन्मलेल्या माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या राजमातेच्या जन्मभूमीतून तमाम मराठीजणांना ऊर्जा मिळते. ही ऊर्जा भावी पिढीत पेरण्यासाठी राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या नावे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजात महिला विद्यापीठ उभारण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे. या विषयाच्या अनुषंगाने तज्ञांच्या भेटी घेऊन माहिती संकलनासही त्यांनी सुरुवात केली आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे देशातीलच नव्हे तर दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ मध्ये महिला शिक्षणासाठी याची मुंबईत स्थापना केली. या विद्यापीठातून १९२१ मध्ये ४ महिला पदवीधर झाल्या. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या विद्यापीठाचे ४ कॅम्पस, ३९ विभाग, १३ इन्स्टिट्यूट आणि १६६ महाविद्यालये आहेत. राज्याचा विचार करता हे एकमेव महिला विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, शिक्षण असे उद्दिष्ट साध्य केले जात आहे. या प्रवाहाचा झरा विदर्भात अपेक्षित प्रमाणात पोहचू शकला नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी या भूमीतही महिला विद्यापीठाची गरज आहे.

मुंबई राजधानी तर नागपूर या राज्याची उपराजधानी असल्याने विदर्भातही असे विद्यापीठ आवश्यक असल्याचा सूर उमटू लागला आहे. या विद्यापीठासाठी पोषक वातावरण आणि सुविधा सिंदखेडराजात उपलब्ध असल्याचेही पवळ यांनी प्रस्तावातून लक्षात आणून दिले आहे. महिलांसाठी एक आदर्शवत असे हे स्थळ असल्याने महिला विद्यापीठासाठी याचा विचार व्हावा, असेही पवळ यांनी निवेदनात म्हटले आहे. यासाठी आवश्यक निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी उपलब्ध करून द्यावा, याकडेही त्यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले.

महिलांना समान न्याय कधी?

आज देशात महिला सक्षमीकरण, महिलांना समान हक्क असे नारे दिले जातात. आज राज्याचा विचार करता महिलांच्या उच्च शिक्षणासाठी, विशेषत: त्यांच्यासाठी आजवर केवळ एकच विद्यापीठ का उभारता आले, असा सवालही पवळ यांनी केला आहे. आजवरची ही उणीव दूर करण्यासाठी सिंदखेडराजात राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या नावे महिला विद्यापीठ उभारले जावे, असेही पवळ यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

विकास आराखड्यातच व्हावा समावेश

सिंदखेडराजा विकास आराखडा जाहीर करून विकासकामे केली जात आहेत. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणूनही याचा विचार होईल या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याच विकास आराखड्यात विद्यापीठाचा समावेश करून स्वतंत्र तरतूद करण्यात आल्यास महिला विद्यापीठ उभारणीची वाट सुकर होईल, असा विश्वासही पवळ यांनी व्यक्त केला आहे.

कुलगुरू डॉ. भाले यांच्याशी चर्चा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याशी रामेश्वर पवळ यांनी सिंदखेडराजात माँ जिजाऊ यांच्या नावे महिला विद्यापीठ उभारण्याविषयी चर्चा केली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून विद्यापीठ उभारणीसंदर्भातील बारकावे पवळ यांनी समजावून घेतले. यापुढेही शिक्षणविषयक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा आणि महिला विद्यापीठ उभारणीसाठी सहकार्य मागण्याचे सत्र आपण सुरूच ठेवणार असल्याचेही पवळ म्हणाले.

सर्वपक्षीयांनी यावे एकत्र

समाजातील सर्वच पक्षातील नेत्यांनी या महिला विद्यापीठासाठी एकत्र येण्याचे आवाहन रामेश्वर पवळ यांनी केले आहे. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र आल्यास समाजात एक नवा आदर्श स्थापन करणे शक्य होईल. आजवर एकमेकांवर आरोप करणारे राजकारणी यानिमित्ताने एकत्र आल्याचे दिसून आल्यास एक सकारात्मक चित्र तयार होणार असल्याचेही पवळ यांनी म्हटले आहे.

प्रस्ताव कुणाला सादर?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विदर्भाचे विद्यापीठ वैभव

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठर
  • संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here