अकोल्यात भाजप महापौरांच्या विरोधात अभाविपचं आंदोलन…

अभाविपच्या शिष्टमंडळाला भेटायला महापौर कार्यालयात नसल्याने कार्यकर्ते संतप्त…

शहरातील स्वच्छता आणि पावसाळी नियोजन कोलमडल्याचा अभाविपचा आरोप…

महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अभाविपचा घरचा ‘आहेर’.

अकोला :- अकोल्याच्या भाजप महापौरांच्या विरोधात आज थेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच आंदोलनाची वेळ आली. शहरातील स्वच्छता आणि पावसाळ्यात रस्त्यावर तुंबत असलेल्या पाणी समस्येविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते महापालिकेत महापौरांना निवेदन द्यायला गेले होते. मात्र, यावेळी महापौर कार्यालयात नव्हत्या. त्या सभेलाच उपस्थित असतात, असं या कार्यकर्त्यांना कार्यालयातून सांगण्यात आलं.

यानंतर महापौरांना फोनवर लावण्याची विनंती अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्विय सहायकांना केली. मात्र, स्विय सहायकांनी महापौरांना फोन लावण्यास असमर्थता दर्शविली. यानंतर संतप्त अभाविप कार्यकर्त्यांनी महापौर कार्यालयातच ठिय्या मांडत महापौरांचा निषेध केला.

विशेष म्हणजे अकोला महापालिकेवर भाजपचीच एकहाती सत्ता आहेय. अर्चना मसने या भाजपच्या महापौर आहेत. यावेळी या कार्यकर्त्यांनी महापौरांचाच पक्षाच्या परिवारातील संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत महापौरांचा असा व्यवहार असेल?, तर सामान्य माणसांशी त्या कशा वागत असतील असा सवाल केला आहे.

का करावं लागलं अभाविपच्या कार्यकर्त्यांना स्वत:च्या सत्तेविरोधात आंदोलन :-

अकोला महापालिका… आपल्या कारभारामुळे संपुर्ण राज्यभरात बदनाम झालेली महापालिका. येथील सर्वसाधारण सभा, त्यातील गोंधळ, तोडफोड, शिवीगाळ अन हाणामारीच्या घटना अवघ्या महाराष्ट्रानं अनेकदा पाहिल्या अन अनुभवल्यात. त्यामूळे या महापालिकेच्या कारभाराविषयी, येथील सत्ताधारी-विरोधकांच्या बेबंद कारभाराविरोधात सर्वसामान्य अकोलेकर अक्षरश: मेटाकुटीस आलेला. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम ना होतो येथील प्रशासनावर, ना येथील सत्ताधारी अन विरोधक असलेल्या राजकारण्यांवर.

आज अकोला महापालिकेतील याच कारभाराचा अनुभव आला भाजप परिवाराची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कार्यकर्त्यांना. भाजपला अनेक मोठ-मोठे नेते देणाऱ्या या कार्यकर्ते घडविणाऱ्या ‘मातृसंस्थे’च्या कार्यकर्त्यांनाही येथे हाच अनुभव आला. अन त्यांना थेट ठिय्या आंदोलन करीत आपल्याच महापौरांविरोधात नारेबाजीही करावी लागलीय.

अभाविपचे कार्यकर्ते आज शहरातील विविध समस्यांसंदर्भातील निवेदन देण्यासाठी महापौर अर्चना मसने यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांना महापौर कार्यालयात नसल्याचे लक्षात आले. त्यांच्या कार्यालयात चौकशी केली असता, त्या कधी येतील?, यासंदर्भातही काही स्पष्ट सांगितले जात नव्हते. त्यांना यासंदर्भात फोनवर माहिती देण्यातही टाळाटाळ होत होती. अखेर या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करीत महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या होत्या ‘अभाविप’च्या मागण्या :

निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विदर्भ प्रांत सहमंत्री अभिषेक देवर, महानगर सहमंत्री कोमल जोशी, महानगर सहमंत्री आदित्य केंदळे, कार्यालय व कोष प्रमुख देवाशिष गोतरकर, जयकुमार आडे, आदित्य पवार, उन्नत दातकर, रुपेश तलवारे, शाम महाजन, शुभम मुरकुटे, मनोज साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘अभाविप’कडून महापौरांना दिल्या जात असलेल्या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश आहे.

1) शहरातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थापन नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांना एखाद्या तलावासारखं स्वरूप प्राप्त होतं. त्यावर काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.

2) शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरीकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच नवीन बांधलेल्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडलेले आहेत. महानगरपालिकेने या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना महानगरपालिकेतील यापुढील कुठलेच काम देऊ नये.

3) शहरातील मुख्य रस्ता असलेल्या टिळक मार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे.

4) शहरात कुठलेच ट्रॅफिक सिग्नल सुरू नाही आहेत. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे शहरातील लवकरात लवकर सर्व ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात यावे.

5) शहरात सर्रास कोरोना नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.

‘अभाविप’कडून भाजपला घरचा ‘आहेर’ :

आज ‘अभाविप’ने अकोल्यातील भाजपच्या सत्ताकाळात सुरू असलेला गलथान कारभार आणि सुरू असलेली कामं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नुकत्याच बांधलेल्या नविन रस्त्यांवर खड्डे पडल्याचं निदर्शनास आणून देत त्यांनी एकप्रकारे यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं आहे. यासोबतच बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी करीत ‘अभाविप’नं सत्ताधारी भाजपची एकप्रकारे गोची केली आहे.

यावेळी या कार्यकर्त्यांनी महापौरांचाच पक्षाच्या परिवारातील संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत महापौरांचा असा व्यवहार असेल?, तर सामान्य माणसांशी त्या कशा वागत असतील असा सवाल ‘अभाविप’नं केला आहे. त्यांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण न झाल्यास महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही ‘अभाविप’नं महापालिकेेला दिला आहे. अकोल्यातील महापालिकेतील आजचं ‘अभाविप’चं आंदोलन हे सत्ताधारी भाजपाला मिळालेला घरचा ‘आहेर’ समजला जात आहे.

अखेर आयुक्तांनी स्विकारलं निवेदन :

आज महापौरांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांना महापौर शेवटपर्यंत भेटल्याचा नाहीत. तासभर हे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन बसलेले असतांनाही महापौर अर्चना मसने कार्यालयाकडे फिरकल्याच नाहीत. अखेर दुपारी चारनंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन महापालिका आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे दिलं. आता आज अकरा वाजता भेटण्यासाठी महापौरांनी बोलावल्याचं आहे.

अकोला महापालिकेचा कारभार ‘सत्ताबाह्य केंद्रां’च्या हातात? :- अकोला महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत 80 पैैैैकी 48 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, अकोला महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार ‘दोन-तीन’ सत्ताबाह्य केंद्र चालवित असल्याचं मागच्या साडेचार वर्षांत अनेकदा समोर आलं आहे. आधी अडीच वर्ष भाजपच विजय अग्रवाल महापौर होते. त्यानंतर भाजपच्या अर्चना जयंत मसने या महापौरपदी विराजमान झाल्यात.

मात्र, दोन वर्षांत त्यांचा कोणताही प्रभाव महापालिकेच्या कामकाजावर दिसलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणातील भाजपमधील सत्ताकेंद्रच हा महापालिकेचा कारभार चालवित असल्याचं चित्र आहे. महापालिकेचा कारभार सत्ताबाह्य केंद्र चालवित असल्याने महापालिकेच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडाल्याची भावना अकोलेकरांमध्ये आहे. आज या गोष्टीवर अभाविपच्या आंदोलनानं शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा महापालिका वर्तूळात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here