Home Breaking News in Marathi

चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांनी घेतला तरुणाचा जीव…खोल डोहात बुडून झाला मृत्यू…वरोरा तालुक्यातील घटना

भंडारा : रेती घाटाचा लिलाव झालेला नसतानाही केवळ राजाश्रयामुळे रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे नदीमध्ये पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये असलेल्या पाण्यात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज रविवारला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका अंतर्गत येणाऱ्या वडकेश्वर रेती घाटावर घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.

मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही आणि रेती उपसा करणारी जेसीबी, पोकलॅण्ड आणि बोट नेऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दिनेश अण्णाजी किनाके (३०) रा. बोरी ता. वरोरा जी. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. वरोरा तालुक्यातील माढेडी परिसरात असलेल्या बोरी- वडकेश्वर रेती घाटावर ही दुर्दैवी घटना घडली. या रेती घाटाचा अद्याप लिलाव झालेला नाही, असे असतानाही रेतीतस्कर यांनी मागील काही दिवसांपासून या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री करीत आहे.

रेती तस्कर नदीपात्रातील रेतीचा उपसा करण्याकरिता पोकलॅण्ड, जेसीबी व रेती काढण्याच्या बोटची मदत घेऊन रेती एका ठिकाणी डम्पिंग करतात. त्यानंतर टिप्परच्या माध्यमातून त्याची वाहतूक केली जाते. या रेती घाटावरून दिवसाला किमान २५ ते ३० टिप्पर रेतीची वाहतूक करण्यात येते. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती दिली. मात्र, कारवाई ऐवजी या रेती तस्करांना अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप आता नागरिक करीत आहे.

बोरी येथील दिनेश किनाके हा गुराखी होता. नेहमीप्रमाणे गुरे चाराईसाठी नेले असताना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यातील एक गाय नदीत उतरली. तिला बाहेर काढण्यासाठी दिनेश हा नदी पात्रातील पाण्यात शिरला. मात्र, रेतीचा मोठ्याप्रमाणात उपसा केला असल्याने तिथे मोठा खड्डा पडला असल्याची कल्पना दिनेशला नव्हती. डोहाचा अंदाज त्याला आला नाही, त्यामुळे पाण्याच्या डोहात तो गटांगळ्या खाऊन त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला.

याची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन दिनेशला मृतदेह बाहेर काढला. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही रात्री ८.३० वाजेपर्यंत महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी वडकेश्वर रेतीघाटाकडे फिरकला नाही. रेतीची चोरी करणाऱ्या तस्करांची दोन जेसीबी, एक पोकलॅण्ड व रेती काढण्याची बोट संतप्त ग्रामस्थांनी अडवून धरलेली आहे. आर्थिक मोबदला मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा इशारा मृतक दिनेशची पत्नी शीतल, वडील अण्णाजी किनाके, सुखदेव किनाके, ऋषी किनाके, अंकुश किनाके, हनुमान किनाके, रुपेश किनाके आदींनी दिला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!