मनोर – पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकातून वाढीव गावाकडे रेल्वे रुळावरून चालत निघालेल्या तरुणाचा वैतरणा नदीवरील पुलावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे.चंदू विष्णू तरे असे मयत तरुणाचे नाव असून तो आठवडा भरापूर्वी बोईसर औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीला रुजू झाला होता.गुरुवारी (ता.03) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
गुरुवारी सायंकाळी रेल्वेने वैतरणा स्थानकात उतरून वाढीव गावाकडे वैतरणा नदीवरील पूल क्र.92 वरून चालत घरी जात होता.यावेळी दोन्ही रेल्वे रुळावरून गाड्या आल्याने झालेल्या अपघातात चंदूचा चिरडून मृत्यू झाला.
पालघर तालुक्यातील वैतरणा नदीच्या बेटावर वसलेल्या वाढीवच्या ग्रामस्थांना दरवर्षी रेल्वे अपघातांना अपघातांना सामोरे जावे लागते.चहुबाजूंनी वैतरणा खाडीच्या पाण्याने वेढलेल्या वाढीवच्या ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी होडी आणि रेल्वे रुळाचा वापर करावा लागतो.
वैतरणा रेल्वे स्थानकातून वाढीव गाव गाठण्यासाठी वैतरणा नदीवरील रेल्वेच्या पुलाच्या रेल्वे रूळावर जीव मुठीत घेवून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो.अशा वेळी दोन रुळांवरून गाड्या आल्याने अपघात होवून अनेकांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत.दरम्यान शवविच्छेदना नंतर रात्री उशिरा चंदू तरे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.