मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेची चान्नी पोलिसांकडून फरफट; पोलिसांचा संतापजनक निगरगट्टपणा…

पातुर तालुक्यातील आलेगाव येथील एका महिलेला झालेल्या मारहाणीत ती महिला गंभीर जखमी असताना तिची तक्रार नोंदवून घेऊन तिचा उपचार करणे व आरोपींवर कारवाई करणे ऐवजी महिलेची फरफट करण्याचा प्रताप महिला दिनाच्या एक दिवस आधी चान्नी पोलिसांनी केला.

याबाबत प्राप्त माहिती अशी की पातुर तालुक्यातील आलेगाव येथे भीमनगर मध्ये राहणाऱ्या माया तेलगोटे यांनी चान्नी पोलिसात तक्रार दिली की त्या ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ उभ्या असताना अशोक तेलगोटे नामक इसमाने त्यांना क्षुल्लक कारणावरून वाद करून डोक्यात वार केला.

या मारहाणीत माया तेलगोटे जमीनीवर कोसळल्या नंतर त्यांची मुलगी निकिता सरदार ही त्यांना सावरण्यासाठी आली. तेव्हा तिलाही अशोक तेलगोटे याने शिवीगाळ केली व मारहाण केली. असे तक्रारीत नमूद केले आहे.

या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या माया तेलगोटे यांनी पोलिस चौकीमध्ये जाऊन तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी माया तेलगोटे यांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी किंवा गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या माया तेलगोटे यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी परस्पर दवाखान्यात जाऊन उपचार करण्याचा व नंतर तक्रार देण्यासाठी येण्याचा उरफाटा सल्ला दिला.

पोलीसांच्या या बेजबाबदार सल्ल्यानुसार माया तेलगोटे यांनी आलेगाव येथील पी एच सी मध्ये जाऊन उपचार घेतला. तेव्हा आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांनी सुद्धा या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्याची तसदी घेतली नाही. उपचार करून माया पुन्हा पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेल्या.

तेव्हा पोलिसांनी चौकीत तक्रार देण्याऐवजी चान्नी येथे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तरीही रात्री उशीर होऊनही माया तेलगोटे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोहोचल्या. तेव्हा एवढ्या रात्री एक महिला तक्रार देण्यासाठी आली याचे कोणतेही गांभीर्य लक्षात न घेता पोलिसांनी त्यांना सकाळी तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार माया तेलगोटे यांनी 7 मार्च रोजी सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला पोलिसांकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर या संतापजनक प्रकाराबाबत नागरिक तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. आता माया तेलगोटे यांच्या तक्रारीवर निदान कठोर कारवाई तरी व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

आलेगाव येथील तेलगोटे नामक महिला जखमी अवस्थेत आलेगाव प्राथमिक केंद्रात याल्या होत्या त्यांच्या डोक्याला बऱ्या पैकी मार लागलेला होता त्यांच्यावर प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचरार्थ अकोला पाठवले होते
वैशाली बोमटे वैद्यकीय अधिकारी आलेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here