Friday, May 17, 2024
Homeराजकीयराहुल गांधींवरील कारवाईविरोधातील काँग्रेसच्या मौन सत्याग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग...

राहुल गांधींवरील कारवाईविरोधातील काँग्रेसच्या मौन सत्याग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग…

Share

मुंबई, दि. १२ जुलै
राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. एक दिवसाचे मौन सत्याग्रह संपले आता भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू, असा असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन सत्याग्रह करण्यात आला. या मौन सत्याग्रह आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, खासदार कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, संजय निरुपम, आ. भाई जगताप, आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजित वंजारी, राजेश राठोड, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारला नामोहरम करुन सोडले होते. आज त्याच अस्त्राचा वापर काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात केला आहे. भाजपाच्या भ्रष्ट, अत्याचारी, हुकूमशाही सरकारविरोधात हा लढा सुरु आहे. हा लढा मुंबईसह महाराष्ट्रभर आणखी तीव्र करुन भाजपाचा भांडाफोड करु. राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असताना अदानी-मोदी संबंध काय आहेत असा सवाल विचारल्यानंतर मोदी सरकार घाबरले व आपले पितळ उघडे पडणार या भितीतून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटी कारवाई केली आहे. देशातील जनता हे सर्व पहात असून राहुल गांधींना शिक्षा करुन बेघर करणाऱ्या भाजपाविरोधात वणवा पेटला आहे आणि या वणव्यात भाजपाचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मौन सत्याग्रह आंदोलन हे राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आहे, राहुल गांधींवर ज्या पद्धतीने कारवाई केली त्या अन्यायी कारवाई विरोधात मौन सत्याग्रह आंदोलन आहे. राहुल गांधी असे काय बोलले होते की त्यांची खासदारही रद्द केली. काँग्रेसला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे पण निरपेक्ष यंत्रणेवरही दबाव आहे की काय असे चित्र दिसत आहे. तर देशाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या खेळाडू मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण शरणसिंह मोकाट फिरत आहे. एफआयरमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप आहेत,अशा गुन्हेगाराला भाजपा पाठिशी घालत आहे, त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा व पंतप्रधान मौन आहेत, मणिपूर जळत आहे, त्यावरही मौन आहे आणि अदानीच्या २० हजार कोटी रुपयांवरही मौन आहे, हे त्यांचे मौन देशासाठी मात्र घातक आहे.

राहुल गांधी यांच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात मात्र त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले आहे. न्यायालयाकडूनही न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई लढत आहे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागू आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी तिघे एकत्र आले हे खरे आहे पण त्यात एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री तर तिसरा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणारा असे तीघेजण आहेत, या तिघांचा एकत्र मेळ बसणे अवघड दिसत आहे. एक आमदार म्हणतो मी ११० टक्के मंत्री होणार व पालकमंत्रीही होणारच आणि दुसराच मंत्री होतो आता त्याने लोकांना तोंड कसे दाखवयाचे? असा टोला थोरात यांनी मारला.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. मौनात मोठी ताकद आहे, महात्मा गांधी यांनी दिलेले अहिंसेचे हे मोठे अस्त्र आहे. सत्य, सद्भावना व अहिंसा यावर आम्ही बोलत आहोत तर भाजपा मात्र सत्तेसाठी काहीही करत आहे. लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत पण भाजपा,ईडी, सीबीआयचा गैरवापर करून सत्तेसाठी काहीही करत आहेत. काँग्रेस सत्यासाठी तर भाजपा सत्तेसाठी लढत आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये टिकवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हा लढा देत आहोत. या मौन सत्याग्रह आंदोलनात सहभागी नेते व कार्यकर्त्यांनी काळ्या मुखपट्ट्या बांधून भाजपचा निषेध केला.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: