मुंबईत ४८३ किलोग्राम दर्जाहीन पनीर जप्त…

मुंबई – बृहन्मुंबई, अन्न  व औषध प्रशासन शाखेच्या अन्न सुरक्षा अधिकारी आणि गुन्हे नियंत्रण शाखा यांनी संयुक्त कारवाई करत कमी दर्जाचे पनीर जप्त केले. जप्त केलेल्या 483 किलोग्राम पनीरची किंमत 1,00,680/- रुपये एवढी असून संबंधितांविरोधात चेंबूर पोलिसांत ‍फिर्याद देण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

6 मे रोजी गुन्हे नियंत्रण शाखा पोलिसांना प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई या कार्यालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 1) मे.डेअरी पंजाब, चेंबुर कॉलनी, चेंबुर , मुंबई, 2) वाहन क्र. एमएच 05 डिके 1059 (मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा.ली., बदलापूर , ठाणे यांचे वाहन) 3) वाहन क्र. एमएच 04 केएफ 1546 (मे.दिशा डेअरी, पिम्प्लास,भिवंडी, ठाणे यांचे वाहन) या आस्थापनांची तपासणी केली असता तेथे मे.यशोदा ओर्गनिक फूड प्रा. ली., बदलापूर , ठाणे व मे. दिशा डेअरी, पिम्प्लास,भिवंडी, ठाणे यांनी उत्पादित केलेला पनीरचा साठा वाहतूक व विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

हा साठा कमी दर्जा असल्याच्या संशयावरुन पनीरचे नमुने घेवून उर्वरित 483 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या पनीरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तथापि, पनीरचे नमुने योग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले. त्यामुळे संबंधित विक्रेता, पुरवठादार व उत्पादकाविरुद्ध चेंबुर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

सदरची कारवाई सह आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई म.ना.चौधरी, व सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ७  रा. दि. पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, सु.स.खांडेकर, सं.शा.सावंत, ता.ग.लोखंडे, स.दा.तोरणे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here