मोठी बातमी | यवतमाळात ३० लाखांचा मद्यसाठा जप्त…६ जणांना अटक…राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 11 : येथील राज्य उत्पादन भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे डोर्ली डोळंबा येथे छापा टाकून हरियाणा राज्यात विक्रीस असलेला 30 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला व दारुबंदी कायद्यान्वये सहा आरोपींना अटक करून गुन्ह्याची नोंद केली आहे.

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, यवतमाळ, यांना प्राप्त खात्रीलायक बातमीनुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी मोर गोडावून ईस्टेट, डोर्ली डोळंबा ता. यवतमाळ येथे छापा टाकला असता एका ट्रक मधून हरियाणा राज्यातील विदेशी मद्य दुसऱ्या वाहनामध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमानुसार गुन्हा नोंद करून घटनास्थळी मिळून आलेल्या सहा आरोपींना अटक केली.

या आरोपींमध्ये विनोदकुमार राजपुत इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे वर्धा, निकेत पडडाखे वर्धा, नितीन कळंबकर वर्धा, सतिष येंडाळे अकोला व अमोल कांबळे चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे.सदर गुन्ह्यामध्ये इंम्पेरिअल ब्ल्यु व्हीस्की, मार्बल पावडर व इतर असा एकूण 29 लाख 95 हजार 600 रुपयाचा मद्यसाठा,

तसेच अशोक लेलॅण्ड कंपनीचा 17 लाख किंमतीचा दहा चाकी ट्रक, टाटा कंपनीचा 3 लाख पन्नास हजार किंमतीचे झेनॉन पीकअप चार चाकी वाहन व हुंडाई असेंट कंपनीची दीड लाख किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे.

वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.के.तायकर यांनी केली. कारवाईत निरीक्षक ए.वाय. खांदवे, दुय्यम निरीक्षक एस.एम.मेश्राम, सहायक दुय्यम निरीक्षक आर.एम.राठोड, कॉन्स्टेबल एम.पी.शेंडे, एम.जी.रामटेके, बी.सी.मेश्राम सहभागी झाले होते, असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here