न्यूज डेस्क -औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात एका ८ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. तर ६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना सकाळी उघडीस आली असल्याने भल्यापहाटे हे हत्याकांड घडले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून संभाजी निवारे यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, 8 वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यातून त्यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. परंतु, जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी निवारे यांच्या घरातच हे हत्याकांड घडले आहे. संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. शुक्रवारी ते शहरात जाऊन खरेदी करून आले होते. उशिरा रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर आज पहाटे शेजाऱ्या घराचे दार उघडले दिसले, त्यामुळे घरात डोकावून पाहिले असता तिघांचे मृतदेह आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.