कोरोना’च्या महिन्यांत महावितरणकडूनतब्बल ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या…

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ९.५३ लाख नवीन वीजमीटर उपलब्ध

अमरावतीदि. १८ जून २०२१कोरोना विषाणूच्या दुसऱ्या मोठ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत महावितरणने दैनंदिन ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत मार्च महिन्यात ६६३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मेमध्ये १,०३४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महावितरणने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दरम्यान मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्रीफेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध झाले असून ते पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपात होता. त्यामुळे अत्यावश्यक वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर अहोरात्र कर्तव्य बजावत होते. सोबतच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सीजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केद्रांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आले. यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी वैयक्तिक लक्ष घातले व वरिष्ठ पातळीवर आढावा बैठकांद्वारे या कामांना वेग दिला होता. ही कामे सुरु असतानाच कोविड-१९चे नियम पाळून दैनंदिन ग्राहकसेवा देखील सुरु ठेवण्यात आली.

कोरोनाच्या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत महावितरणने खडतर परिस्थितीत ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्चदाब वर्गवारीमध्ये उद्योग- १७९, वाणिज्यिक- २४, कृषी- ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक- ३८ हजार २४, औद्योगिक- ६६५०, कृषी-३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना- ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. अतिशय खडतर व संकटकाळात देखील ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी कौतुक केले आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरली असली तरी ग्राहकसेवा देताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायात हयगय करू नये. कर्मचाऱ्यांनी आरोग्याची पूर्णतः गंभीरपणे काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे कार्यादेश गेल्या फेब्रुवारीमध्ये दिले होते. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज २ लाख ६९ हजार (३०,६०३), कोकण- सिंगल फेज ३ लाख २४ हजार (२५,७८७), नागपूर- १ लाख ९३ हजार (१८,३६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे ८२ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here