श्रमजीवीच्या निर्णयक ‘निर्धार’ आंदोलनाची धडक…”मातोश्री” व्हाया ठाणे…स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातही आदिवासी, कष्टकऱ्यांनी पारतंत्र्यात राहायचे का ?…विवेक पंडित यांचा सवाल 

ठाणे/दि.१४ फेब्रुवारी
2022 साली भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही आज गरीब, आदिवासी, कष्टकरी बांधव पारतंत्र्यात असल्यासारख्या यातना सोसत आहेत. गरिबांच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर लढणाऱ्या श्रमजीवी संघटनेने आता याबाबत निर्णायक लढाई पुकारली आहे. येत्या 17 फेब्रुवारीला (सोमवार) श्रमजीवी संघटनेचे लाख्खो सभासद आपल्या प्रलंबित मूलभूत मागण्यांसाठी ठाणे येथे निर्धार मोर्चाने येत आहेत. या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाही तर हा मोर्चा थेट मुख्यमंत्र्यांच्या “मातोश्री” बंगल्यावर धडकणार आहे. या मोर्चात ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि मुंबईसह राज्यातील इतरभागातूनही हजारो आदिवासी कष्टकरी बांधव सहभागी होणार आहेत. या मोर्चाची जय्यत तयारी सर्वत्र सूरु असून गावागावात नियोजित बैठका सुरू आहेत, जोरदार मोर्चेबांधणी करत मोर्चाचा प्रचार सुरू आहे. “कोण म्हणतो देणार नाय? घेतल्या शिवाय जाणार नाय! या घोषणेप्रमाणे हा मोर्चा मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहील, ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असे संघटनेचे संस्थापक #विवेक पंडित #vivek_pandit यांनी म्हटले आहे.
1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ मूठभर धनधांडग्यांना मिळाले. गरीब कष्टकरी आदिवासी बांधव आजही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता दिली मात्र प्रत्यक्षात ती कुठे आहे असा प्रश्न वीटभट्टी वरील वेठबिगार मजूरांच्या वेदना पाहिल्यावर पडतो. ठाणे,पालघर,रायगड,मुंबई आणि नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आदिवासींच्या वेदना असह्य आहेत. त्यांची भूक,दारिद्य्र ,बेरोजगारी आजही तशीच आहे. कुपोषणाने हजारो बालकं मृत्यूच्या मुखात जात आहेत. आदिवासी मजूर वेठबिगारीसारख्या गुलामगिरीच्या पाशात अडकलेला आहे मग कसे म्हणायचे आपण स्वतंत्र्य आहोत? असा सवाल घेऊन श्रमजीवी निर्धार मोर्चाने येत आहेत.
ही लढाई आता पुढे नेण्याची वेळ आली आहे. ही वेळ चर्चेची नाही तर युद्धाची आहे. महात्मा गांधीजींनी दिलेल्या अहिंसक या आंदोलनाच्या मार्गाने यापुढे प्रखर आणि निर्णायक आंदोलन होतील. याबाबत विवेक पंडित यांनी 26 जानेवारी रोजी उसगाव येथे याबाबत घोषणा केली होती. राज्यातील प्रश्नांवर समाधान नाही झाले तर मुख्यमंत्री राहतात त्या मातोश्रीवर देखील धडक दिली जाईल असेही पंडित यांनी जाहीर केले होते. मोर्चात आदिवासी, शेतकरी, कुपोषण, शिक्षण, आश्रमशाळा, आरोग्य, वन हक्क, घरखालील जमीन, गावठाण विस्तार, पिण्याचे पाणी, स्थलांतर मजुरांचा प्रश्न, बेरोजगारी यांसारखे अनेक प्रश्नांवर शासनाकडून योग्य निर्य अपेक्षीत आहे.
सध्या संघटनेच्या प्रत्येक गावात बैठका सूरु असून गावकमेटी बळकट करण्याचे काम सुरू आहे, शिबीर आणि बैठकातून श्रमजीवी सैनिक घडविण्याचे काम सुरू आहे. झोनच्या,विभागाच्या बैठका घेऊन मोर्चाच प्रचार केला जात आहे. लोकं मोर्चाला जाण्यासाठी भांडी, सरपण, सुकी मासळी, कडधान्य ,तांदूळ असे सर्व सामान जमवा जमाव करून मोर्चाला निर्णायक लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.
संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली संस्थापिका विद्युल्लता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघणार आहे. सरकार मोर्चेकरी आदिवासी बांधवांच्या मागण्यात ठाण्यातच मान्य करतेय की हे श्रमजीवी वादळ मुंबईत दाखल होतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, श्रमजीवीचा मोर्चा म्हणजे अहिंसक आंदोलनांचा आदर्श नमुना आहे मात्र लाखभर आदिवासी बांधव ठाण्यात मुंबईत दाखल झाले तर कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेवर ताण येणार हे मात्र नक्की.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.