तुर विक्री साठी शेतकऱ्यांच्या जात नोंदणी करण्याचा आदेश देणा-या नाफेडच्या अधिका-यांना तुरूंगात टाका…राजेंद्र पातोडे.

अकोला, दि. १४ – नाफेडच्या तुर विक्री करीता ऑनलाइन नोंदणी करीता नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांना ‘जात’ नोंदणी करणे आवश्यक करण्याचा आदेश काढणा-या जातीयवादी अधिका-याला तात्काळ तुरूंगात डांबण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
नाफेड हे सद्यस्थितीत शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली आहे.शासनाकडून जाहीर झालेल्या हमीभावाने तुरीची विक्री करण्यासाठी नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे. सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक सह जातीची नोंद देखील करावी लागते.वर्धा जिल्हा मधील नाचणगांव येथे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.शासनाने उघड सुरू केलेला शासकीय जातीयवाद आहे.शेतीचा सातबारा व त्यावरील तुरीचा उतारा शेतकरी असल्याचा सर्वात मोठा पुरावा असताना शेतकऱ्यांना जात विचारणा नोंदणी करायला सांगणे ही पुरोगामी महाराष्ट्रात अभूतपूर्व कलंकित करणारी घटना आहे.शासकीय पातळीवर जात किती खोल रूजलीय त्याचा हा जिवंत पुरावा आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना विचारल्या जाणा-या जातीचे प्रयोजन काय आहे? याची चौकशी व त्या आदेशामागील सुत्रधारांना शोधून तुरूंगात डांबण्याची गरज आहे.हा आदेश काढणा-या अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शासनाने जाहीर केलेला तुरीचा पाच हजार आठशे रूपये हमीभाव अत्यंत कमी असून तो आठ हजार रूपये करण्यात यावा.शिवाय १४ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्याची तारीख वाढवून १ मार्च करण्याची मागणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.