संत तुकाराम महाराज जयंती निमित्त डॉ.बालाजी जाधव यांचा लेख…शब्दांची जाण असणारे संत…संत तुकोबाराय…

दि. १२ जानेवारी २०१९ रोजी जिजाऊ जन्मोत्सव ला जिजाऊ श्रुष्टी वरून खेडेकर साहेबानी या वर्षीपासून तुकोबांची जयंती साजरी करण्याचे जाहीर गेले आणि पुढच्याच महिन्यात २ फेब्रुवारी रोजी तुकोबांचे मूळ गाव देहू येथून तुकोबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला लागली. तुकोबांच्या सार्वजनिक जयंतीचे २०२० हे दुसरे वर्ष. या अगोदर तुकोबांची जयंती साजरी न होता तुकाराम बीज साजरी व्हायची. याचे कारण तुकोबा सदेह वैकुंठाला गेले हे प्रचलित असलेले मिथक. मराठा सेवा संघाचा स्थापनेपासूनच महापुरुषांच्या दैवतीकरणाला विरोध आहे. तो तसा तुकोबांच्या दैवतीकरणाला सुद्धा आहे. तुकोबांचा जन्म प्रत्येक मानवासारखा देहू येथे झाला. तुकोबांच्या घराण्यात पूर्वापार विठ्ठलभक्ती चालत आलेली होती. त्यांच्या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिवंत माणसात देव पाहणे. जनी जनार्दन हा संस्कार पुढे तुकोबा आणि त्यांची भावंडे यांच्यावर झाला. म्हणूनच तुकोबांनी ऐन दुष्काळात अव्वा च्या सव्वा व्याजाने कर्जवसुली करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी करणे पसंत केले. लोकांच्या जीवनात दुःख आहे तर आपण त्यांच्या दुःख निवारण करण्याचे कारण बनू या असा संकल्प त्यांनी केला आणि हीच त्यांची पूजा जन्मभर चालू राहिली.

एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा तुकोबांनी ज्ञान घेण्याचा आपल्या पूर्वजांचा वारसा न सोडता तो नेटाने चालू ठेवला. यातूनच त्यांनी भाषेवर प्रचंड प्रभुत्व मिळवले. अन्याया विरोधात हेच शब्द मग तुकोबांच्या हातील शस्त्रे बनून धावून आली. आणि जिथे अन्याय आहे तिथे तुकोबांनी ‘नाही भीड भाड । तुका म्हणे सान थोर ।’ असा पवित्रा घेत आपल्या शब्दांचे कोरडे ओढले. विशेष म्हणजे तुकोबा हे या देशातील कृषी परंपरेचा, श्रमण परंपरेचा वारसा सांगणारे होते. म्हणून त्यांना इतर लोकांनी केलेल्या श्रमावर जगणाऱ्या ऐतखाऊ लोकांची प्रचंड चीड होती. म्हणूणच ते म्हणतात, ‘भिक्षापात्र अवलंबणे । जळो जिने लाजिरवाणे ।’ इतरांच्या कष्टावर जगत भीक मागत जगणाऱ्या फुकट्या लोकांना तुकोबांनी तुमचे जीवन लाजिरवाणे आहे असे खडसावले. अर्थात ऐतखाऊ लोकांनी या भीक मागण्याला सुद्धा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान असे सांगितले. आणि हे सांगत असताना त्यांनी श्रम संस्कृती मधील लोकांना भाषेवरील प्रभुत्वाच्या माध्यमातून गुलाम बनवण्याचे कार्य केले. तुकोबांना भाषा हे दुधारी शस्त्र असल्याचे माहित होते. म्हणून त्यांनी अक्षर न घोकण्याच्या तथाकथित परंपरेचा धिक्कार करत भाषेवर प्रचंड प्रभुत्व मिळवले. समोरील शत्रू आपल्यासोबत ज्या शस्त्रनिशी लढत आहे तीच शस्त्रे आपण सुद्धा वापरायची असतात. अन्यथा त्या युद्धात आपला पराभव अटळ असतो हे तुकोबा आपल्या वाडवडीलांकडून शिकले होते. या देशातील सांस्कृतिक लढा हा आर्य विरुद्ध अनार्य आहे आणि आर्यांनी अनार्यांना ज्या ज्या माध्यमातून गुलाम बनवले होते त्यात भाषेचा क्रमांक बराच वर लागत होता. नामदेव, चक्रधर, ज्ञानदेव यांसोबतच तुकोबांचे पूर्वज यांनी मराठीला जो धर्मभाषेचा दर्जा दिला होता त्याच भाषेत उत्तमोत्तम असे अभंग निर्माण करून लोकांना तारण्याचे, त्यांना सहज सोपा धर्म देण्याचे कार्य तुकोबांनी केले.

तुकोबांना मानणाऱ्या सर्व लोकांनी आज जगातील महत्वाच्या भाषांवर प्रभुत्व मिळवणे अतिशय गरजेचे झाले आहे. ज्याप्रमाणे शिवकुळामध्ये जन्मलेल्या शंभूराजांनी संस्कृत सोबतच इतर भाषांवर प्रचंड प्रभुत्व मिळवले तसे प्रभुत्व आजच्या युवकांनी मिळवणे गरजेचे आहे. ज्ञान परंपरेचा हाच वारसा पुढे शिवकुळातील प्रत्येक राजाने चालवला. म्हणूनच महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या तंजावर येथे मराठी भाषिक स्थापन होऊन सुमारे दोनशे वर्षांपर्यंत राजभाषा मराठी होऊ शकली. खेडेकर साहेब नेहमी सांगत असतात की मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा प्रत्येक भारतीयांच्या बोलीभाषा, मातृभाषा झालेल्या आहेत. यासोबतच कॉम्प्युटरची भाषा सुद्धा सर्वांना येणे गरजेचे नाही तर अनिवार्य झालेली आहे. तरच क्षणा क्षणाला ज्ञानाचा स्फोट होणाऱ्या जगात आपला निभाव लागणार आहे. तुकोबांची भाषा शेवटी शेवटी एवढी व्यापक झाली की हे अवघे त्रिभुवन त्यांना त्यांचा स्वदेस वाटायला लागला. अर्थात त्यांचे साहित्य हे सार्वकालिक आणि स्थळ, काळ, प्रांत यांच्या सीमारेषा ओलांडून समस्त मानवाच्या हृदयाला भिडणारे होते. म्हणून तुकोबा म्हणतात, झाली माझी वैखरी । विश्वम्भरी व्यापक । जगभरातील दुःख कवेत घेण्याचा आवाका तुकोबांच्या भाषेचा निर्माण झालेला होता. तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त आपणही प्रचंड ज्ञान मिळवून ग्लोबल होण्याचा प्रयत्न करणे हीच खरी तुकोबांना आदरांजली ठरेल.

 

@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद, ९४२२५२८२९०
(लेखक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तथा पंचफुला प्रकाशन या लोकप्रिय प्रकाशन संस्थेचे प्रकाशक आहेत)

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.