आतापर्यंत देशात २ कोटी लोकांना कोरोनाची लागण…कोरोना मृत्यूंच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर…

न्यूज डेस्क – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तर दररोज लाखोंच्या संख्येनं कोरोना बाधित आढळून येत असून, गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनअभावी वा बेड न मिळाल्याने मृत्यू ओढवत आहे. मृत्यूचं हे थैमान सुरूच असल्याचं गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे. भारतातील एकूण कोरोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी काहीसा दिलासा देणारी असली, तरी मृत्यूंच्या बाबतीत चिंता कायम आहे. देशातील करोना रुग्णवाढ मंदावली असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाख ५७ हजार २२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ३ लाख २० हजार २८९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे नवीन रुग्ण आणि घरी परतलेले रुग्ण ही संख्या दिलासा देणारी आहे. मात्र, देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कोणतीही घट झाली नसल्याचं दिसत आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींचा संख्या दोन लाख २२ हजार ४०८ इतकी झाली आहे. तर देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here