सरकारी कर्मचाऱ्यांच्या यंदाही १५ टक्के मर्यादित बदल्या…

न्यूज डेस्क – राज्यात कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने या वर्षीही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के मर्यादित बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्व संबंधित विभागांनी १४ ऑगस्टपर्यंतच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यानंतरच्या बदल्यांना मान्यता दिली जाणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढलेल्या शासन आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या बदल्यांच्या कायद्यानुसार दर वर्षी एप्रिल ते मे महिन्यात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधरण बदल्या केल्या जातात. गेल्या वर्षी करोनाच्या साथीमुळे घाऊक बदल्यांवर निर्बंध आणून के वळ १५ टक्के मर्यादितच बदल्या करण्याचे आदेश काढण्यात आले होते. करोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन या वर्षीही १४ ऑगस्टपर्यंत मर्यादित स्वरूपात बदल्या करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

करोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बदल्यांच्या भत्यावरील खर्च कमी करण्यासाठी एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादित बदल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संबंधित पदांवर जास्त कालावधी झाला आहे, त्यांच्या प्राधान्याने बदल्या कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.

३१ जुलै पर्यंत या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांवर १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विशेष कारणास्तव बदल्या करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र विशेष कारणास्तव बदल्या १० टक्के मर्यादित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here