सव्वातीन लाख पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर्सची केंद्र शासनाकडे कोरोना प्रतिबंधासाठी मागणी…आरोग्यमंत्री राजेश टोपे

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई किट्स, नऊ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

या साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली, तरी राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरिता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य राज्यांनी त्यांच्या स्तरावर खरेदी करू नये केंद्र शासनाकडून त्याचा पुरवठा करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र केंद्र शासनाकडून राज्यांना पाठविण्यात आले आहे.

सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई किट्स, तीन लाखाच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र शासनाकडे या सर्व साहित्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

राज्याला याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांना निर्देश दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here