डेस्क न्यूज – कोरोना विरुद्ध च्या लढ्यात आता क्रीडापटूंनी सुद्धा उडी घेतली असून काल भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखत ५० लाखांचा तांदूळ देण्याची घोषणा केली होती तर आज भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी उदारता दाखवत ५० लाखांची मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत केली आहे. काही खेळाडूंनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य, मास्कचंही वाटप केलं आहे.
लोकांनी घरात राहून स्वतःची कशी काळजी घ्यावी याबाबत सचिन वारंवार मार्गदर्शन करत होता. सोशल मीडियावर सचिनकडून कोणतीही मदत न आल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
अखेरीस सचिनने करोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरत सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सचिनने नेहमी मदत केली आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानानंतर, सचिनने २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं दान केलं होतं.
सचिन व्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे. आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपलं सामाजिक भान राखत मदत केली आहे.