संचारबंदीमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत आस्थापने सुरू राहणार…अडकलेले मजूर व गरजू नागरिकांची व्यवस्था प्रशासनातर्फे

सचिन येवले यवतमाळ

यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपात्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात व जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या काळात कृषी क्षेत्राशी निगडीत आस्थापने सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे.

यात कृषी उत्पादने खरेदी करणा-या कंपन्या एमएसपी ऑपरेशनसह सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चालविण्यात येणा-या मंडी किंवा महाराष्ट्र शासनाने अधिसुचित केलेल्या मंडी, रासायनिक खतांची दुकाने सुरू राहतील. शेती करणारे शेतकरी किंवा शेतमजुर यांना शेती करण्याकरीता मुभा राहील. शेती करीता उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे वाहतूक करता येईल. रासायनिक खते, किटकनाशके, बी-बियाणे बनविणारी व पॅकिंग करणारी युनीटे सुरू राहतील. शेतमालाची काढणी व पेरणी करणा-या मशीन्स जसे कंबाईन हार्वेस्टर आणि इतर कृषी अवजाराची राज्यांतर्गत व आंतरराज्य वाहतूक सुरू राहील.

केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉकडाऊनचे आदेश पारीत झाले असतांना सुध्दा काही भागात मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्या मूळ गावी स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याबाबतचे लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अडकलेले मजुर, गरीब लोक, आणि गरजू नागरिकांची तात्पुरती राहण्याची व खाण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात यावी. जे नागरिक त्यांच्या मूळ गावी पोहचले आहे त्यांची आरोग्य विभागाकडून योग्य तपासणी करून त्यांना

विलगीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी व आरोग्य नियमानुसार त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. औद्योगिक क्षेत्र, दुकाने किंवा वाणिज्य आस्थापना लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असली तरी येथे काम करीत असलेल्या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही कपात न करता मजुरी देण्यात यावी. तसेच त्यांना कामावरूनसुध्दा काढून टाकण्यात येऊ नये. जे कामगार स्थलांतरीत कामगारांसह भाड्याच्या घरात राहत आहे, त्यांच्याकडून घरमालकांनी एक महिन्याकरीता घरभाड्याची मागणी करू नये. जर अशा घरमालकांनी कामगारांना किंवा विद्यार्थ्यांना त्यांचे घर खाली करण्याबाबत जबरदस्ती केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

तसेच भारत सरकारचे गृहसचिव यांनी आदेशित केले आहे की, सर्व मालाच्या वाहतुकीला अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेला असा भेदभाव न करता परवानगी देण्यात येत आहे. पोट कलम 2 (ग) अंतर्गत अपवाद असलेल्या पेंशनमध्ये ईपीएफओ ने पुरविलेल्या पेंशन व भविष्य निर्वाह निधी याचा समावेश होतो. कलम 3 अंतर्गत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सेवांचासुध्दा अंतर्भा करण्यात आला आहे. किराणा सामानामध्ये स्वच्छतेच्या वस्तु जसे हॅन्डवॉश, साबण, जंतुनाशक, बॉडीवॉश, शॅम्पू, सरफेस क्लिनर, डीअर्जंट, टीश्यु पेपर, टूथपेस्ट, सॅनिटरी पॅडस, बॅटरी सेल व चार्जर यांचा समावेश होतो. दुधाचा संग्रह व वितरण करण्याची संपूर्ण साखळी त्याच्या पॅकिंग मटेरिअलसह परवानगी देण्यात येत आहे. प्रिंट मिडीया अंतर्गत वर्तमानपत्रे वाटप करण्याच्या साखळीस परवानगी देण्यात येत आहे.

वरील आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 च इता संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने पारीत करण्यात आले आहे.

लोकशाही दिन स्थागित
यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपात्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात व जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी कळविले आहे.

गृह विलगीकरण कक्षात 91 नागरिक
यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यातील 91 नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आरोग्य पथकाच्या माध्यमातून त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येत असून घरातून बाहेर न पडण्याचे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांनीसुध्दा आपापल्या घरातच राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत एक नागरीक भरती असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here