भंडारा : संचारबंदीत घराबाहेर पडण्यावर नागरिकांना बंदी आहे. मात्र, बंदी झुगारून दहा-बारा युवक गावातील मैदानात क्रिकेट खेळत असल्याची माहिती पालांदूरचे ठाणेदार सूनगार यांना मिळाली. ते लगेच क्रिकेट सुरू असलेल्या मैदानावर पोहचले.
पोलिसांना बघताच युवक सैरावैरा पळू लागले. दरम्यान, सहा युवक पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्यावर पालांदुर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत कारवाई केली. या कारवाईने संचारबंदीत घराबाहेर निघणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
◆ लाखनी तालुक्यातील पालांदुर पोलिस स्टेशन हद्दीतील ढिवरखेडा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असल्याने सर्वत्र लॉकडाउन करून संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
मात्र, संचारबंदीचा आदेश झुगारून शहरात तथा ग्रामीण भागातही अनेक नागरिक बिनबोभाटपणे फिरताना दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव, तर दुसरीकडे नागरिकांचा स्वैराचार. यामुळे पोलिसांसह जिल्हा प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
◆ ढिवरखेडा येथे काही हौसी युवक गावातील मोकळ्या मैदानात एकत्र येऊन क्रिकेट खेळत असल्याची माहिती ग्रामस्थांनीच पालांदूर पोलिसांना दिली. येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार सूनगार यांनी वेळ न करता आपल्या पथकासह ढिवरखेड येथील क्रिकेटचे मैदान गाठले.
क्रिकेट खेळण्यात अगदी तल्लीन असलेल्या युवकांसमोर पोलिसांची गाडी थांबतात, मिळेल त्या मार्गाने सर्वांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांपेक्षाही चतुर व कर्तव्यात तरबेज असलेल्या पालांदूरच्या पोलिसांनी यातील सहा क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पकडले. त्यांना पालांदूरला आणून त्यांच्यावर संचारबंदी झुगारून कायदा मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सदर युवकांनी पोलिसांसमोर यापुढे अशी चूक करणार नाही, अशी शपथ घेत सोडून देण्याची विनवणी केली. कारवाईनंतर सर्व युवकांना सूचनापत्रावर सोडून देण्यात आले. ही कारवाई म्हणजे, पुढच्याला ठेच, मागचा शहाणा, या युक्तीप्रमाणे सर्वांसाठी संदेश ठरला आहे. संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्या युवकांवर झालेली ही बहुदा देशातील पहिलीच कारवाई ठरली आहे.