संचारबंदीच्या काळात हालचाल न करु शकणाऱ्या दिव्यांगांना मिळणार सुविधा…राजेंद्र लाड

ना.धनंजय मुंडे व श्रीम.प्रेरणा देशभ्रतार यांचे विशेष आभार

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आली आहे.याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे व दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीम.प्रेरणा देशभ्रतार यांचे शासन मान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

लॉकडाउनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच दिले जाणार आहे.यामध्ये धान्य,कडधान्य,डाळी,तांदूळ,तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क,रुमाल,साबण,डेटॉल,फिनेल अशा आरोग्यविषयक साहित्यांचाही समावेश असणार आहे.

दिव्यांगांना हे आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात येणार आहेत.राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.अन्य दिव्यांगांना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याशिवाय ज्या ज्या ठिकाणी कम्युनिटी किचन किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण आणि नाष्ट्याचे डबे पुरविण्यात येणार आहेत.दिव्यांग व्यक्तींना बँका,पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात याव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.पेन्शन लाभार्थी दिव्यांगांना एक महिन्याचे निवृत्तीवेतन आगाऊ देण्यात यावे असाही निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान,सर्व जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांना एक हेल्पलाइन नंबर टोल फ्री स्वरूपात प्राप्त करून द्यावा व त्याबाबत सर्व दिव्यांगांना विविध माध्यमांतून माहिती देण्यात यावी,जेणेकरून या सर्व सुविधा मिळवण्याबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील सर्व दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू व आरोग्यविषयक सुविधा सामान्य माणसाप्रमाणे मिळाव्यात व कोणत्याही अतिदिव्यांग,बेवारस आदी व्यक्तींचे हाल होऊ नयेत असा सामाजिक न्याय विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here