विवेक पंडित यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “अनावृत्त पत्र”…लॉक डाऊन मुळे उपासमारीला आलेल्या गरीब आदिवासींसाठी ठोस पावले उचलण्याचे केले आवाहन…

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक “अनावृत्त पत्र” लिहिले आहे. या पत्राद्वारे पंडित यांनी मुख्यंत्र्यांना लॉक डाऊनमुळे गरीब, मजूर, आदिवासींची उपासमार टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

“उपाशी किंवा अर्ध पोटी झोपी जाणाऱ्या, ज्या लाखो अभागी, आदिवासी, कातकरी, हमाल, छोट्या कारखान्यात काम करणारे, किमान वेतना पासून वंचीत असणाऱ्या लोकांनी आपल्या पोटाची, लहानग्या लेकरांच्या भुकेचा आक्रोश कसा थांबवायचा याचा विचार करुन, ठोस पावले उचलायची जबाबदारी, मंत्री मंडळातील कोणी घेतली असती तर, आज आली आहे, तशी भीषण परिस्थिती कदाचित टाळता आली असती.” तसेच, “या आगोदर लिहिलेल्या दोन पत्रांचा गांभीर्याने विचार करून पावले उचलली असती तर आज या भीषण परिस्थिला सामोरे जाण्याची वेळ आली नसती” असेही नमूद केले आहे.

त्यामुळे विवेक पंडित यांच्या या ‘अनावृत्त’ पत्राची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कशाप्रकारे दाखल घेतात व या आणीबाणीच्या प्रसंगी वंचित, दुर्बल आदिवासींसाठी कोणत्या तत्काळ व ठोस उपाय योजना करतात हे पाहणे महत्वाची ठरणार आहे

 

विवेक पंडित यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना “अनावृत्त पत्र”

दिनांक 3 एप्रिल 2020
जव्हार

प्रति,
माननीय श्रीमान उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.

विषय : सद्य स्थितीतील दारुण परिस्थिती

महोदय,

या आधी मी आपणास 3 पत्रे लिहिली होती, ती आपणा पर्यंत पोहोचली नसावीत असे समजून
आज आपणास अनावृत्त पत्र लिहीत आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल असा विश्वास आहे.

कोरोना चा महाभयंकर मुकाबला आपण करीत आहात, ते सारा महाराष्ट्र पाहत आहे. मला त्यासाठी मनः पूर्वक आपले आभार मानायचे आहेत, आणि लवकरच आपणास यश येवो अशी प्रार्थना यानिमित्ताने करीत आहे.

आपण, आणि आपल्या मंत्री मंडळातील सहकारी वारंवार ज्या सूचना करीत आहात, त्याही राज्यातील जनतेच्या हिताच्याच आहेत.

मला या ठिकाणी विनम्र पणे काही सूचना करायच्या आहेत. त्या समजून आपणा कडून कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगतो. मी व्यक्तिशः स्वतः जव्हार मोखाडा भागात योग्य काळजी घेऊन फिरत आहे, त्यातून आणि अन्य ठिकाणी माझे सहकारी जे काम जीवावर उदार होऊन करीत आहेत, त्याचा या सूचनांना आधार आहे.

1) या परिस्थितीचे गांभीर्य 17 मार्च रोजीच ओळखून, माझ्या संघटनेच्या ज्या सदस्य आहेत, अशा हनुमान टेकडी भिवंडी येथील देह विक्रय करणाऱ्या भगिनींना हा व्यवसाय त्वरित बंद करण्याची विनंती केली, त्यांनी त्वरित ती मान्यही केली, तसे त्वरित त्यांच्या घरी आठवडा भराचा धान्य साठा मी उपलब्ध करुन दिला, ज्यात मान मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचा ही सहभाग मिळाला.

2) लोकांनी ‘सोशल डिस्टेनसिंग ‘ ठेवावे, घरीच थांबावे, घरा बाहेर पडू नये, या सूचना आवश्यक आहेतच, त्यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र, ज्यांच्या घरी धान्य साठाच नाही, आज मिळवायचं आणि आजच संपवून उपाशी किंवा अर्ध पोटी झोपी जायचं, असं दुर्दैवी जिणे ज्या लाखो अभागी, आदिवासी, कातकरी, हमाल, छोट्या कारखान्यात काम करणारे, किमान वेतना पासून वंचीत असणाऱ्या लोकांनी आपल्या पोटाची, लहानग्या लेकरांच्या भुकेचा आक्रोश कसा थांबवायचा याचा विचार करुन, ठोस पावले उचलायची जबाबदारी, मंत्री मंडळातील कोणी घेतली असती तर, आज आली आहे, तशी भीषण परिस्थिती कदाचित टाळता आली असती.

3) आज पालघर जिल्ह्यातील सर्वच कातकरी कुटुंबे आणि बहुसंख्य आदिवासी भुकेला आहे. आज पर्यंत काही अपवाद वगळता रेशन चे धान्य पोहचलेले नाही, धान्याचा साठा जरी मिल मध्ये किंवा गोदामात असेल, तरी वाहतूक यंत्रणा अपुरी आहे. त्यातही अचानक हे संकट आल्याने आपले काम अपूर्ण टाकून मजुरांनी घर गाठले, त्यांच्या कडे दमडीही शिल्लक नाही, अशांना विशेषतः आदिवासी ना आपण ते कमी किंमतीत घ्यायला सांगता. कुठून आणतील ते ही थोडीशीही रक्कम? आदिवासी विभागाला हे पैसे देता आले नसते का?

4) गेले दोन महिन्याहून अधिक काळ रोजगार हमीवर ज्या मजुरांनी काम केले, त्यांना त्यांची मजुरी अजून मिळाली नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला, परंतु आश्वासना खेरीज काहीही हाती आले नाही.

5) आदिवासी विकास विभागाने, आपल्या आदिवासी बांधवाना जगवण्यासाठी, तातडीने पावले उचलणे आवश्यक होते, हे मी आपणास या आधीच्या पत्रात लिहिले होते, तसेच मान आदिवासी विकास मंत्र्यांना ही फोन करुन बोललो होतो. राज्यात 16 प्रकल्प संवेदनशील आहेत, किमान त्याला क्षेत्रात जिथे भूक आहे, तिथे आवश्यक ते आर्थिक अधिकार प्रकल्प अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. आजवर काहीही कारवाई नाही.
कोरोना ऐवजी गरीब आणि आदिवासी भुकेने मरतील हे मी आपणास 17 मार्च रोजी लिहिले होते, आज त्याची पुन्हा आठवण करुन देत आहे.

6) रेशन वर केवळ तांदूळ पुरेसे नाहीत, एकतर कोकणातील सर्व जिल्ह्यात केवळ तांदूळ द्यावा, गहू नको. त्याशिवाय डाळ महिना किमान 3 किलो, तेल किमान 2 किलो, मीठ, मसाला, हळद दिली नाही तर ह्या वस्तू ते कुठून घेणार?

7) पुरवठा साखळी पूर्ण विस्कळीत झाली आहे. आम्हाला लोकांना धान्य द्यायचे आहे, मला रोज अनेक दाते स्वतः हून सांगतात, ते मदतीसाठी तयार आहेत, परंतु साठा उपलब्ध नाही. तर दुसरी कडे गावच्या दुकानात ही लोकांना धान्य मिळत नाही. या बाबत युद्ध पातळी वर उपाय योजना झाली तर संकट टळू
शकेल.

गरीब आणि आदिवासी भूकबळी जाऊ नयेत, एवढाच हेतू आपणास हे पत्र लिहिण्याचा आहे. माझे याबाबतीत सर्व प्रकारचे सहकार्य आपण गृहीत धराल अशी खात्री आहे.

कळावे

आपला विश्वासू

विवेक पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here