विलगीकरण कक्षात ५१ जण दाखल…सर्वांचे रिपोर्टस अप्राप्त…स्वयंसेवी संस्थामार्फत भोजन व धान्य किटचे वाटप…

यवतमाळ, दि. ५ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ५१ जणांना दाखल करण्यात आले आहे. यात निजामुद्दीन संमेलनाशी थेट किंवा त्यांच्यासोबत लिंक असलेल्या नागरिकांची संख्या ४४ आहे. या सर्वांचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात तपासणीकरीता पाठविण्यात आले असून ते अद्याप अप्राप्त आहेत. विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या नागरिकांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ८७ आहे.

सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे इतर राज्यांचे यवतमाळ जिल्ह्यात ५०९७ अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे इतर राज्यात १२८५ नागरिक आहेत. आपल्या राज्यातील ५४३नागरीक यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्याचे ३२१० नागरिक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. बाहेर असलेल्या या नागरिकांच्या मदतीकरीता जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित राज्यांच्या प्रशासनासोबत नियमित संपर्क साधण्यात येतो.

तसेच इतर जिल्ह्यात असलेल्या यवतमाळच्या नागरिकांना तेथील जिल्हा प्रशासनाकडून मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित फॉलो-अप सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने ३७ निवारा गृहे सुरू केली आहे. यात त्यांच्या राहण्याची तसेच खाण्याची व मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ६६  स्वयंसेवी संस्थामार्फत आतापर्यंत 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत २५७०० लोकांना भोजन वाटप आणि  ७७४४  धान्याच्या किट वाटण्यात आल्या आहेत. याशिवाय 2895 मास्क, दुध आणि ब्रेड पॅकेट 3540 व इतर साहित्य 785 वाटप करण्यात आले आहेत.

येथील विलगीकरण कक्षात एकूण 230 बेडची व्यवस्था करण्यात आल्यामुळे बाहेरून आलेल्या तसेच इतरांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी प्रशासनाला स्वत:हून माहिती द्यावी. त्यासाठी 07232- 240720, 07232-239515 आणि टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here