सचिन येवले,यवतमाळ
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला रोखण्यासाठी सध्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेइतकेच पोलिस दलासमोरील आवानही मोठे आहे. जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी हे आव्हान अत्यंत लिलया पद्घतीने सांभाळले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच कर्मचाऱ्यांच्याही सुरक्षेस प्राधान्य देऊन जिल्हा पोलिस दल कोरोनाविरोधातील लढाईत २४ तास कार्यरत असल्याचे सांगितले.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. ही महत्वाची जबाबदारी पार पाडण्याचे काम पोलिस दलावर आहे. या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील दोन हजार ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ३०० होमगार्ड मागील बारा दिवसांपासून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार हे सध्या इतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर २४ तास कर्तव्यावर असल्याचेच दिसत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री-अपरात्री अधिकाऱ्यांचे फोन, विविध पदाधिकाऱ्यांचे फोन आदींबाबी सांभाळावे लागत आहेत. पोलिस अधीक्षकांचे कामकाज सकाळी ८ वाजेपासूनच सुरू होते. यामध्ये जिल्ह्याभरातील बंदोबस्ताचा आढावा घेणे, वरिष्ठांकडून आलेल्या सूचना, निर्देशांना खालील अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविणे, शासनाच्या आदेशाचे पालन होईल, याची दक्षता घेणे आदी बाबींवर ते स्वत: फिरून लक्ष देत आहेत.
सध्या बाहेर राज्यातील शेकडो नागरिक आपल्या जिल्ह्यात क्वॉरंटाइनमध्ये आहेत. ते इतरत्र फिरू नयेत, याकरीता ठेवलेल्या बंदोबस्तावर लक्ष ठेवणे, जिल्ह्याच्या सीमा इतर राज्याशी जोडलेल्या असल्याने तेथून कोणी येणार नाही, याची दक्षताही वेळोवेळी भेटी देऊन घेत आहेत. विशेष म्हणजे या दरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, त्यांना कर्तव्यादरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध ठिकाणी भेटी देऊन प्रयत्न करत आहेत.