म्हणुनी विवेके । काही करणे ते निके…डॉ बालाजी जाधव, औरंगाबाद

आजपासून सुमारे चारशे वर्षांपूर्वी इ स १६३० मध्ये महाभयंकर असा दुष्काळ पडला होता. लोक अन्न अन्न करत मरत होते. लोकांनाच खायला अन्न नसल्याने जनावरांचे काय हाल असतील हे काही सांगण्याची गरज नाही. गावच्या गाव ओस पडू लागली. कित्येक गावे उजडून गेली.

गावाबाहेर जनावरांच्या हाडांचे खच पडू लागले. लोकांची एवढी अन्नान दशा सुरु झाली की कित्येक लोक याच जनावरांची हाडे घरी आणायची आणि या हाडांचा चुरा करून खायची. अहो इतिहासकार तर यापुढे जाऊन असे दाखले देतात की पोटातील आगीमुळे बापाची नजर पोटच्या मुलाच्या मांसावर जायची आणि मुलाची नजर आपल्या मायबापांच्या मांसावर जायची. थोडक्यात काय तर आलम हिंदुस्थानातील तो महाभयंकर असा दुष्काळ होता.

सरकार नावाची व्यवस्था अजून जन्माला यायची होती. आणि कोणताही दुष्काळ असो, महामारी असो पहिल्यांदा मरते ती माणुसकी आणि नंतर मरतो उरला सुरला माणूस. जिथे सरकारच नाही तिथे या लोकांच्या दुःखाला काय पारावार? ही सर्व अवस्था एवढी बिकट होती की जणू काही या मातीत देव आहे की नाही? असा प्रसन्न पडावा.

नव्हे तो पडला आणि लोक विचार करू लागले काय तुम्ही येथे नसालसे झाले । आम्ही न देखिले पाहिजे ।। ….. आणि ज्या तरुणाला हे सर्व पाहू वाटत नव्हते, ज्या तरुणाच्या काळजाला हे सर्व पाहून भेगा पडत होत्या, माणसांची अशी अवस्था पाहून ज्याचे काळीज तीळ तीळ तुटत होते तो उठला. खाडकन जागा झाला. त्याने मागचा विचार केला नाही, पुढचा विचार केला नाही, पुढे माझ्या बायका लेकरांचे काय होईल याचाही विचार केला नाही आणि त्या तरुणाने आपल्या घरातील धान्यांची कोठारे या दुष्काळग्रस्त लोकांसाठी खुले केले.

लोकांना आवाहन केले अरे या लोकांनो या….तुमच्या बायका पोरासहित या….. आणि घेऊन जा लागेल तेवढे धान्य….. पण दुष्काळात तडफडून मरू नका….. आणि कुठेतरी माणुसकी पाझरली आणि मग माणसं जगायला लागली….. त्या तरुणाचे, त्या युवकाचे, त्या सावकाराचे होय सावकाराचे नाव होते तुकोबा ……. सावकाराचा मुलगा आणि त्यातही दुष्कळासारखा प्रसंग आला की वाट्टेल त्या दरात माल विकून नफेखोरी करता येते. (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कित्येक सावकार अव्वाच्या सव्वा दराने नाही का माल विकत आहेत)

पुढच्या सात पिढया बसून खाता येतील एवढा नफा कमवता येतो आणि हा युवक मात्र आपल्या घरातील धान्यांची कोठारे लोकांसाठी खुली करत होता. काही व्यावहारिक लोकांनी त्याला सांगितलं सुद्धा अरे वेड्या दुष्काळाचा फायदा घेऊन नफा कमावण्याची आयती संधी चालून आलेली असताना हा आतबट्ट्यातला व्यवहार तुला कुणी शिकवला? का हा उपद्व्याप करत आहेस? त्यावेळेस या तरुणाने उत्तर दिले, “बुडता हे जन न देखवे डोळा । म्हणुनी कळवळा येत असे ।।” माणूस आणि माणुसकी बुडत असताना मी डोळे लावून शांत बसू? नाही नाही माझ्या भविष्याचे काय होईल ते पुढचे पुढे पाहू सध्या या लोकांना जगवणे हाच माझा धर्म आहे.

केवळ धान्याची कोठारे खुली करूनच तुकोबा शांत बसले नाहीत तर आपल्या वडिलांनी लोकांना दिलेली कर्जखते काढली आणि आपल्या वाट्याला आलेल्या कर्जाच्या रकमा आपल्या हाताने फाडून नष्ट केल्या….. कर्जमाफी केली. अर्थात हा पैसा सरकारी नव्हता. वैयक्तिक होता. मूळ रकमेवरचे व्याज जरी तुकोबांनी माफ केले असते तरी तो न्यायच झाला असता. परंतु एवढा व्यवहारी विचार करायला ते काही स्वार्थी नव्हते.

…. आणि आम्ही एवढे नतद्रष्ट आहोत की आम्हाला तुकोबांच्या या कृतीचे मोठेपणही समजून आले नाही. अवघ्या जगाला हजारो वेळेस उच्चरवाने सांगण्यासारखा चमत्कार आमच्या तुकोबांनी केला आणि आमच्या बुद्धीचा आवाका पहा केवढा आम्ही तुकोबांनाच *दुष्काळाने गांजून गेलेला, अव्यवहारी सावकार, धंद्यात नुकसान झालेला असं म्हटलं अरे ज्या लोकांकडे तुकोबांचे कार्य समजून घेण्याची अक्कल नाही त्यांच्या हृदयात तुकोबांचा कळवळा कसा जागा होईल? आणि अशी माणसे मग तुकोबा सारखे मानवतावादी वागतील याची शक्यता तरी कशी गृहीत धरायची.

माझा धर्म, माझी संस्कृती मला भुकेल्याला अन्न द्यायला शिकवते. भूत दया गायी पशूंचे पालन । तान्हेंल्या जीवन वनामाजी ।। असे तुकोबांनीच तर सांगून ठेवले आहे. गरिबी दूर करण्यासाठी जमेल तेवढी कृती करायला शिकवते. गरिबांची वस्तीच जगाला दिसू नये म्हणून भिंत बांधायला सांगणारा धर्म माझा असूच शकत नाही.

सध्या आपल्याकडे तुकोबाकालिन महाभयंकर दुष्काळ नसला तरी जीवघेण्या कोरोनाची साथ सुरु आहे. कित्येक लोक आपल्या घरी पोचू शकले नाहीत. ज्यांचं हातावर पोट आहे असे कित्येक कामगार व त्यांची कुटुंबे उपाशी आहेत, ऊस तोड कामगारांचे हाल आहेत, कित्येक शेकऱ्यांचे सुद्धा हाल आहे, अहो ज्यांचं नाव काढलं तरी समाज नाक मुरडतो अशा वेश्या उपाशी आहेत, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भविष्याची चिंता आहे. रोजगाराची चिंता आहे.

अशावेळी त्यांच्यासाठी एक कृतिशील पाऊल उचलणे हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे. आपापल्या घरात लाईटी घालवून दिवे पेटवण्याने या लोकांच्या घरातील चूल पेटणार नाही बांधवांनो. आपण जमेल तशी मदत करणे हे लाखो दिवे लावण्यापेक्षा श्रेष्ठ आहे…… तुकोबा म्हणायचे ना केवळ पांडुरंगाचे नाव घेत चांगली कामे करणे हे हजारो यज्ञ पेटवण्यापेक्षा श्रेष्ठ कार्य आहे.

आपण त्या तुकोबांच्या धर्माचे आहोत. वाळवंटातील अस्पृश्याच्या मुलाला कडेवर घेणाऱ्या आणि तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणाऱ्या एकनाथांच्या धर्माचे आहोत. आणि वारकरी संप्रदाय जनामनात रुजावा म्हणून ज्ञानाचे दीप लावणाऱ्या नामदेव- ज्ञानेशाच्या धर्माचे आहोत. आम्ही वारस आहोत गाडगेबाबा, तुकडोजी यांचे. आम्ही वारस आहोत भगवान बाबांचे. तुकोबांनी सांगितलंय, “म्हणुनी विवेके । काही कारणे ते निके ।।” म्हणजे एखादी कृती करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीला विचारा की असे करण्याने खरेच कुणाचा फायदा होणार आहे काय? आणि त्या विवेक बुद्धीची परवानगी घेऊनच निकं म्हणजे एक नंबरी काम करुया.

विशेष म्हणजे आज माझ्या बळीराजाला पाताळात घालणाऱ्या वामनाची जयंती सुद्धा आहे. ज्या वामनाने माझ्या धर्माच्या बळीराजाला पाताळात घातले त्या वामनाच्या जयंतीला आम्ही दिवाळी साजरी करायची? ते कदापि शक्य नाही.

मी दिवे घालवणार नाही….. मी कृत्रिम दिवे पेटवणारही नाही…… ज्यांच्या जीवनात कोरोनाने अंधकार आणलेला आहे त्यांच्या जीवनात प्रकाशाचा कवडसा टाकता येतो का ते पाहूया ….. हे ही जमलं नाही तर महाराष्ट्रासाठी स्वतःच्या कुटुंबासारखे झटणाऱ्या मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदर्श घेत मुख्यमंत्री फंडात मदत करूया……

माझी एक भाकर हाच माझा दिवा….. माझा मदतीचा एक हात हाच माझा दिवा……

@ डॉ बालाजी जाधव, औरंगाबाद
मो. ९४२२५२८२९०

(टीप : धार्मिक राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी…. बाबांनो आज जे लाखो कामगार उपाशी आहेत त्यातले ९५% कामगार हिंदूच आहेत. त्यांच्यासाठी शासकीय- प्रशासकीय स्तरावर कार्य करणे म्हणजे हिंदू धर्म वाढवणेच होय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here