भुकेल्या कष्टकऱ्यांना श्रमजीवी संघटनेचा आधार…चार जिल्ह्यातील २० हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

जव्हार/दि. 5 एप्रिल

कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग संकटात आहे. या पार्श्वभूमीवर संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा सर्वात जास्त फटका हा आदिवासी मजूर कष्टकरी बांधवांना बसला आहे. पालघर ठाणे,रायगड, आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात या लॉकडाऊनमुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली होती.मात्र या बांधवाना आधार द्यायला श्रमजीवी संघटना पुढे सरसावली आहे. आदिवासींच्या प्रश्नावर संघर्ष करणारी संघटना गेले 10-12 दिवस सातत्याने या भुकेल्या आदिवासींना दिलासा देण्याचे काम करत आहे. स्वतः विवेक पंडित या मोहिमेचे नेतृत्व करत जव्हार मोखाड्यात मदतीसाठी फिरत आहेत.

जव्हार मोखाड्यात आतापर्यंत सुमारे पाच हजार कुटुंबाना तर या चार जिल्ह्यात सुमारे 20 हजार कुटुंबाना 8 ते 10 दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संघटनेने करून एक अनोखा विक्रम केला आहे. गरिबांच्या हाकेला धावत अनेक दानशूर दात्यांनी पुढे येऊन संघटनेकडे ही मदत पोहचविल्याने हे शक्य झाल्याचे सांगत विवेक पंडित यांनी सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आहेत. तर संकट काळात अजूनही सरकारची मदत मात्र या गरजूंपर्यंत पोहचली नसल्याने विवेक पंडित यांनी खंत व्यक्त केली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून आलेले स्थलांतरित मजूर लॉक डाऊन मुळे मुंबईत अडकून पडले मजूर असोत, किंवा ठाणे,भिवंडी ,कल्याण, वसई परिसरातील स्थलांतरित होऊन आलेले मजूर करोनाच्या भीतीने आपल्या घराकडे पायी निघालेले कष्टकरी असोत, त्यांचे प्रचंड हाल होत होते.

आपल्या कोवळ्या बालकांसह पायी येत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात त्यांना थांबवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांना आपल्या गावी किंवा सुरक्षित स्थळी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाही. शेकडो परप्रांतीय कामगारांना निवारा आणि अन्नाची सोय करण्यात आली.
आपल्या जीवावर उदार होऊन या संकट काळात अहोरात्र काम करणाऱ्या संघटनेच्या सर्व लढवय्या सैनिकांचे पंडित यांनी कौतुक केले.

कोरोना हे संकट महाभयंकर आहेच,त्याबाबत सतर्क राहण्याच्या दृष्टीने उपाययोजनेत सहकार्य करणेही जनतेचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे, मात्र अशा परिस्थितीत गरीब कष्टकरी भुकेला राहणार नाही याची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य आहे.

मात्र दुर्दैवाने आज लॉकडाऊन नंतर 14 दिवस उलटले मात्र सरकारची मदत पोहचली नाही हे दुर्दैव असल्याचे पंडित यांनी सांगितले. “श्रमजीवी संघटनेला शक्य आहे तितकी मदत केली आहे, मात्र आजही अनेकांना मदतीची गरज आहे, सरकार अजूनही याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही,

जर शासनस्तरावरून मदतीच्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही तर संघटना केवळ मदत करून गप्प बसणार नाही तर नाईलाजास्तव संघटनेला पुढचे पाऊल टाकावे लागेल, आणि मग या भुकेल्या गरिबांच्या हक्कासाठी संघटना कायदा भंग होईल याचीही तमा बाळगणार नाही” असा इशारा विवेक पंडित यांनी सरकारला दिला आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी यात स्वतः लक्ष घालून ही उपासमार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याचेही विवेक पंडित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here