बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला असताना भारतातही त्याचे पडसाद उमटले. शासकीय, राजकीय कार्यक्रमांसह विविध खेळांच्या स्पर्धा, शालेय महाविद्यालयीन परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, सिनेमा यांच्यासह साहित्यिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली.
त्यामुळे अनेक नियोजित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले किंवा रद्द करण्यात आले. असंच एक कवीसंमेलन आणि सादरीकरण स्पर्धेचा कार्यक्रम ध्यास कवितेचा काव्य मंच, मुंबई यांच्या वर्धापदिना निमित्ताने बोरिवली येथील सायली इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रसिध्द गझलकार प्रशांत वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात पार पडणार होता.
परंतू शासकीय यंत्रणाना सहकार्य करतानाच आपल्या साहित्यिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, यासाठी आयोजकांनी संमेलन नियोजित ठिकाणी होणार नाही, असे सर्व सादरकर्त्यांना कळवले.
पण कविता जिंकली पाहिजे हीच भावना सर्वांच्या मनात होती. त्या अनुषंगाने ऑनलाईन काव्य स्पर्धा घ्यायचे ठरले आणि ६८ स्पर्धकांकडून ध्वनिमुद्रीकरणाच्या माध्यमातून कविता मागवण्यात आल्या. त्याला प्रतिसाद देत ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि येथेच कविता जिंकली. या स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत प्रशांत वैद्य सरांनी ६ अंतिम विजयी क्रमांक जाहीर केले. यात प्रथम क्रमांक पंकज जावळेकर, द्वितिय डॉ. सुजाता मराठे, तृतिय प्रदीप बडदे आणि उत्तेजनार्थ प. सा. म्हात्रे, कुसुम बागले, नमिता आफळे सरस ठरले.
सर्व विजेत्यांना अमृताई फाऊंडेशन (नियोजित) रोझोदा. ता. रावेर यांच्या वतीने समारंभपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे.
“सर्व प्रथम मी ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबईच्या सर्व संघाचे अभिनंदन करतो…! मराठी कवितेचा संस्थेने घेतलेला हा ध्यास खरोखरंच कौतुकास्पद आहे…! ध्यासचं अजून एका निर्णयाबद्दल कौतुक की “कोरोना विरुध्द कविता” यात कविताच सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून ध्यासने कविता स्पर्धा ऑनलाईन घेतली…! खरंच यासाठी त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे…!” अशा शब्दांत प्रसिध्द गझलकार प्रशांत वैद्य यांनी ध्यासच्या कार्याचा सन्मान केला.
ध्यासचं ब्रीददवाक्य “कविता जगणाऱ्या प्रत्येकासाठी” असं आहे आम्ही कविता जगतो आणि इतरांना सुध्दा जगायला लावतो. आज कविता आणि कोरोनाच्या युध्दात कविता जिंकली आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे ध्यासचे अध्यक्ष संदेश भोईर यांनी सांगितले. तसेच घरी रहा सुरक्षित राहा असा संदेश ध्यासचे सचिव राजेंद्र चौधरी यांनी दिला या ऑनलाईन कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ध्यासचे प्रसिध्दी प्रचार प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी घेऊन लिलया पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ध्यासच्या महिला संपर्क प्रमुख रजनी निकाळजे, ध्यासचे सदस्य संतोष मोहिते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.