जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार…सोसायट्यांनी फवारणी करू नये…कोरोना नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय…

बाळू राऊत प्रतिनिधी

मुंबई, : – सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो,

त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असे आज कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली.

बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत असे ठरले की, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच अशी फवारणी व त्या – त्या ठिकाणच्या परिस्थितीच्या संनियंत्रणाबाबत निर्णय घेईल. कोणत्या स्वरुपाची, कुठे आणि कशाची फवारणी करायची याबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणेकडूनच घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत अन्य यंत्रणा व घटकांनी अशी फवारणी करू नये, असे सूचित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here