डेस्क न्यूज – कोविड १९ फोटो मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. या प्रतिमा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध होणार असून भारतात जेव्हा ३० जानेवारी रोजी पहिला करोना रुग्ण सापडला होता त्याच्या नमुन्याआधारे हे फोटो घेण्यात आले आहे.
भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो.
केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला.
त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”
https://twitter.com/ANI/status/1243539153016500225/photo/1