सार्वजनिक कार्यक्रम फक्त घरीच कुटुंबामध्ये साजरे करण्याचे आवाहन…
गडचिरोली :
कोरोना संसर्गामुळे जिल्हयासह संपुर्ण देशात संचारबंदी लागू केलेली आहे, यादरम्यान कोणताच सन, उत्सव, जयंती किंवा इतर धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी नाही असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. असे कार्यक्रम सार्वजनिक साजरे न करता आपल्या कुटुंबात घरामध्येच साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
येत्या काळात गुडफ्रायडे, महात्मा फुले जयंती, ईस्टर संडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर काही कार्यक्रम येत आहेत. या आणि इतर कोणताही कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात साजरा करू नये असे शासनाकडून कळविण्यात आले आहे. संचार बंदी व साथरोग नियंत्रण कायदा लागू असल्याने कोणालाही बाहेर पडून कार्यक्रम घेता येणार नाहीत असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
गर्दी होईल असे कोणतेही पाऊल नको :
कोरोना संसर्गाबाबत राज्यातील वाढत्या संख्येमुळे प्रशासनाकडून सर्व जिल्हयांना गर्दी टाळण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरीकांचे सहकार्य अपेक्षित असून सर्व धर्मगुरू, लोक प्रतिनिधी, संघटना प्रमुख तसेच अध्यक्ष यांनी आपल्या सहका-यांना आवश्यक सूचना देवून गर्दी न करण्याबाबत आवाहन करावे.
जर काही कार्यक्रमानिमित्त गर्दी झाल्यास आयोजकांसह त्या ठिकाणी असणा-या प्रत्येकावर कारवाई करण्याचे प्रशासनाला आदेश प्राप्त झाले आहेत. कोणालाही कार्यक्रम घेण्याची परवानगी प्रशासन देत नाही त्यामुळे कार्यक्रम घेणेकरीता त्यांनी प्रशासनाकडे मागणी करू नये असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सर्व स्तरावर संचार बंदीची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे.