मुंबई दि. ५ – कोरोनाचा अंधःकार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रविवार दि. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपल्या घराच्या दारात किंवा खिडकीत बाल्कनी मध्ये मेणबत्ती किंवा दिवे पेटवा आणि राष्ट्राची एकजूट दाखवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार आज मी माझ्या घरी मेणबत्ती पेटवून या मोहिमेत सहभागी होणार आहे. सर्वांनी एकाचवेळी दिवे पेटवून कोरोना विरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार करणार आहोत. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशातील 134 करोड जनता पाठिंबा देणार आहे. देशाच्या ऐक्याचा उजेड आज सर्व जगाला दिपवून टाकणार आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.
काही लोक मात्र या कार्यक्रमावर टीका करीत आहेत. दिवे लावण्याचा हा कार्यक्रम मूर्खपणा असल्याचा आरोप करणारे छोट्या विचारांचे लोक आहेत. अशी टीका करून ते देशाच्या ऐक्याच्या प्रदर्शनाला विरोध करण्याचा महामुर्खपणा करीत आहेत. मात्र आम्ही त्यांना महामुर्ख म्हणण्याचा वाईट शब्द उच्चारणार नाही.
मात्र हे टीकाकार अविचार करीत आहेत.विरोधकांचा दर्जा ढासळत आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची उंची अधिक वाढत आहे. असे सांगत कॉंग्रेस सारख्या विरोधी पक्षांनी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावण्याच्या मोहिमेला विरोध करण्याचा अविचार करू नये . भारताची 134 करोड जनता आज दिवे लावून;मोबाईल टॉर्च द्वारे ; मेणबत्ती द्वारे आपल्या राष्ट्रभक्ती चा एकजुटीचा उजेड पाडून कोरोनाला पळवीणार आहेत.
जगासमोर भारतीय जनतेच्या ऐक्याचा अभूतपूर्व प्रकाश सोहळा आज दिसणार असल्याचा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.