आजार शेंडीला अन मलम मांडीला !…

लोकांचा मेंदू काम करेनासा झाला की काय? असा प्रश्न निर्माण होईल इतकी बालीश प्रतिक्रिया लोक मोदींचे समर्थन करताना देत आहेत.

कोरोना महामारी हवाई सिमा सील न करणे, प्रवासी न तपासता सोडले म्हणून देशात आला. हे नागडं सत्य आहे.त्या वर सरकारला धारेवर धरण्या ऐवजी तबलीगीचा कार्यक्रम ह्याला दोष दिला जातो.

मुळात दिल्ली पोलीस व हवाई वाहतूक, इमिग्रेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय.जागतिक स्तरावर हायअलर्ट असताना देशाच्या राजधानी मध्ये काय कार्यक्रम होताहेत हे सरकारला माहीत नसेल तर हा सरकारी नालायकपणा आहे.त्याचा दोष केंद्र सरकारचा आहे.त्यासाठी जबाबदार केंद्र व दिल्ली मधील सरकार आहे.

जानेवारी मध्ये कोरोनाने देशात पहिला मृत्यू झाला होता.फेब्रुवारी मध्ये जागतिक आरोग्य संघटना महामारी जाहीर करते आणि आपल्या देशात केंद्र सरकार २३ मार्चला झोपेतून जागं होते.केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा मुळे देश व येथील नागरिक धोक्यात आले.त्याविरोधात सरकारला जाब विचारायला हवा तर तो विचारला जातो तबलीगी जमात व सरकारला प्रश्न विचारणारांना.

जानेवारी ते मार्च तीन महिने वेळ होती कोरोना विरोधी आपत्ति व्यवस्थापन करायला.परंतु सरकार गाफील होते.मास्क, ऑक्सिजन सिलेंडर यांची पुरेशी व्यवस्था तपासणी केंद्र युद्ध पातळीवर ऊपलब्ध करण्यात येणे आवश्यक होते.आरोग्य यंत्रणा सजग व चाक चौबंद करणे, सुविधा उपलब्ध करणे याला पुरेसा वेळ होता.

जागतिक महामारी विरोधात राष्ट्रीय आपदा व्यस्थापन देशपातळीवर सुरू करायला हवे होते.राज्याराज्यातील मुख्यमंत्री व केंद्र सरकार यांच्या बैठका घेऊन नियोजन झाले पाहिजे होते.ते झाले नाही उलट सरकार तीन महिने ट्रंप चे आतिथ्य, मध्य प्रदेशातील सरकार पाडणे व संसदेचे अधिवेशनात व्यस्त होते.दरम्यान कोरोना ग्रस्त प्रवासी देशात विना तपासणी दाखल होत राहीले.देशातून मास्क व सिलेंडर यांची निर्यात होत राहीली.

हा सर्व प्रकार राष्ट्रीय द्रोह व देशातील नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा अक्षम्य गुन्हा आहे.जो मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाने केलाय. हे संकट देशावर लादले ते मोदी व केंद्र सरकारने परंतु काही लोक यावर अजिबात चर्चा करीत नाही.ते दोष देतात फक्त मुस्लिम व सरकारला आरोपी ठरविणारांना.काहींच्या मेंदू मध्ये २०१४ सालापासून आलेल्या बिघाडामुळे त्यांची विचारशक्ती पुर्ण कुंठीत झाली आहे.

कोरोना देशात आला कसा? यावर बोलण्या ऐवजी मुस्लिम कसे देश विरोधात आहेत यावर ते बुध्दी पाजळताहेत परंतु कुणालाही साधा प्रश्न पडत नाही की याच काळात योगी आदित्यनाथ, यदूयुरप्पा किंवा मध्य प्रदेश मध्ये देखील लॉकडाऊन चा भंग केला गेला.तो मात्र गुन्हा ठरत नाही कारण ती करणारी माणसं भाजपची आणि विशेषतः मुस्लिम नसतात.

अफवा पसरविणे गुन्हा असताना भिडे नावाचा विकृत गौमूत्र व तुपाने कोरोना बरा होतो, संचारबंदी माहीत असताना तरूणांना मैदानावर पाठवा म्हणून सांगतो ती अफवा ठरत नाही, तर भिडेला अटक करा म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देणारा विरोधात संचारबंदी कायदा मोडण्याचा गुन्हा दाखल होतो! त्यावर टिका होत नाही तर समर्थन केले जाते.त्यात राज्य सरकारही सामिल असतं.

तोच प्रकार दिवे व टॉर्च लावायला सांगण्यात आल्यावर घडतोय.मोदींनी जनतेला दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानाची कामे आहेत की आम्ही काय व्यवस्था व सुविधा उपलब्ध केल्या हे सांगणे? जागतिक महामारी मध्ये जर सरकारचा बालीशपणा हा मास्टर स्ट्रोक वाटत असेल तर भक्तगणांनी मेंदू काढून टेबलवर बरणीत सुरक्षित ठेवला आहे,त्यामुळे बरणीत ठेवलेल्या मेंदूला सरकारी बेजबाबदारपणा दिसत नाही म्हणून ते कुठल्याही आपत्ति करीता एका विशिष्ट समूहाला जबाबदार ठरविणार,हे ओघाने आले.

“ज्याने कायदा मोडला तो गुन्हेगार मग तो कुणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे” असा पवित्रा घेणे म्हणजे माणूस बुध्दी वापरतो, त्याचा निरक्षीर विवेक कायम आहे हे समजते परंतु येथे बेसिक मध्येच लोचा आहे.

राजेंद्र पातोडे
अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here